गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

अ + स्खलित असा हा शब्द बनलेला आहे. स्खलित हे विशेषण स्खलन या शब्दावरून तयार झालेले आहे. स्खलन म्हणजे पडणे. मग अस्खलित म्हणजे न पडता असा अर्थ होतो. भाषेच्या संदर्भात जेव्हा हा शब्द वापरला जातो तेव्हा याचा अर्थ न अडखळता असा घ्यावा. (नाहीतरी अडखळलो म्हणजे आपण पडतोच!) याशिवाय मुद्दा आणि अर्थ यापासून सुद्धा न स्खलित होता म्हणजेच मुद्दा आणि अर्थ न सुटता बोलणे हा अर्थ सुद्धा अस्खलित बोलण्यामध्ये अभिप्रेत असतो.

जसे: तो अस्खलितपणे मराठी आणि इतरही भाषा बोलू शकतो.

हिंदीमध्ये बरेचदा धाराप्रवाह या विशेषणाचा उपयोग केला जातो. धाराप्रवाह बोलणे ही अस्खलित बोलणे याच्या पुढची अवस्था आहे. अस्खलित बोलण्यामध्ये फक्त न अडखळता स्पष्ट बोलणे अपेक्षित आहे तर धाराप्रवाह म्हणजे ज्याप्रमाणे एखादा प्रवाह अनिर्बंध वाहतो त्याप्रमाणे शब्दांचा पाणलोट वाहतो अशी कल्पना आहे. सहाजिकच पाणलोटामध्ये जशी प्रचंड शक्ती असते तशीच धाराप्रवाह वाणीमध्ये सुद्धा मतपरिवर्तन करण्याची किंवा भावनांना हात घालण्याची अमर्याद शक्ती असते. मराठीत याच अर्थाचा ओघवता हा शब्द वापरला जातो. अस्खलित बोलण्यामध्ये उच्चारांच्या अचूकतेवर जास्त भर असतो. त्यामुळेच एखादी गोष्ट वाचून दाखवणे या संदर्भात अस्खलित हा शब्द जास्त वापरला जातो. ओघवता हा शब्द सहसा भाषेचे किंवा वाणीचे विशेषण म्हणून वापरला जातो.

जसे: त्याची भाषा फार ओघवती आणि सुरेख होती आणि शब्दोच्चारही अस्खलित होते.

एखादी व्यक्ती अस्खलित बोलत असेल तर ती ओघवत्या पद्धतीने बोलू शकेलच असे नाही परंतु ओघवत्या पद्धतीने बोलणारी व्यक्ती सहसा अस्खलित बोलतच असते ही भूमिका विचारात घेण्यासारखी.