दिक् आणि गज या दोन शब्दांनी आजचा शब्द बनलेला आहे. दिक् म्हणजे दिशा आणि गज म्हणजे हत्ती. पण या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे? पुराणकथांमध्ये अशी मान्यता आहे की आठही दिशा म्हणजे चार दिशा आणि चार उपदिशा या आठ हत्तींनी तोलून धरलेल्या आहेत. जसे पूर्व दिशा ही ऐरावत नावाच्या हत्तीने तर पश्चिम दिशा ही अंजन नावाच्या हत्तीने तोलून धरलेली आहे. दक्षिण दिशा वामन नावाच्या हत्तीवर तर उत्तर दिशा सार्वभौम नावाच्या हत्तीवर विसावलेली आहे. संपूर्ण आकाश तोलून धरणारे हे हत्ती निश्चितच अत्यंत बलवान असतीलच हे अगदी स्पष्ट आहे.
त्यामुळेच त्यामुळेच एखाद्या क्षेत्रातील अतिशय कुशल आणि बलवान व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीने त्या क्षेत्रासाठी आधारभूत ठरणारे काम केले असेल अशा व्यक्तीला दिग्गज म्हणून संबोधले जाते. जसे: शास्त्रीय संगीताच्या प्रांतात कुमारजी मोठे दिग्गज होऊन गेले.