गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

गरमागरम केशरी जिलबीच्या नावाने व कल्पनेने ज्याला ती खावीशी वाटणार नाही असा माणूस विरळाच. याशिवाय जिलबी - रबडी, दूध - जिलबी, जिलबी - फाफडा किंवा जिलबी व पोहे अशा अनेक रूपात जिलबी आपल्या खाद्यसंस्कृतीचा भाग झाली आहे. जिलबी फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात आणि युरोपातीलही स्पेन या देशात आवडीने खाल्ली जाते.

जिलबी या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती आढळून येतात:

इसवी सनाच्या आठव्या शतकात इराक मध्ये अबु अल हसन उर्फ जिरयाब या नावाचे एक प्रसिद्ध संगीतकार होऊन गेले. हा गृहस्थ जितका उच्च कोटीचा संगीतकार होता तितकाच उत्तम पाकशास्त्रीही होता. त्याने अरबी पदार्थ बालाक्लावासाठी वापरण्यात येणाऱ्या मूळ पेस्ट्रीचा आकार बदलून, गोलाकार करून, त्याला पाकात बुडवून एक नवा पदार्थ तयार केला. त्याच्या नावावरून या पदार्थाला जिरयाबी हे नाव पडले. हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध झाला आणि फारसी भाषेत त्याचे नाव झलाबिया असे रुढ झाले. याच नावावरून पुढे मराठीत जिलबी, हिंदीत जलेबी व बंगालीत जिलपी अशी या पदार्थाची नावे पडली.

काही मंडळींच्या मते हा पदार्थ मूलतः भारतीयच आहे. याचा पुरावा म्हणून साधारणतः साडेपाचशे वर्षांपूर्वी जैन आचार्य जिनदेवसूरी यांच्या ग्रंथाचा उतारा देण्यात येतो. यामध्ये त्यांनी जलवल्लिका असे नाव देऊन जिलबीची पाककृती सांगितलेली आहे. जल म्हणजे पाणी आणि वल्लिका म्हणजे वाळ्यासारखा गोलाकार. म्हणून जलवल्लिका म्हणजे ज्यात पाण्यासारखा रस म्हणजे पाक भरलेला आहे अशी गोलाकार मिठाई. यातून पुढे जिलेबी आदी नावे तयार झाली असे ह्या मंडळींचे म्हणणे आहे.

कुठलीही उत्पत्ती ग्राह्य धरली तरी जिलबीची गोडी ही अनेकानेक वर्षांपासून सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते हे मात्र निश्चित खरे…