गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

किमया या शब्दाचा मूळ अर्थ हिणकस धातूंचे सोन्यामध्ये रूपांतर करण्याची जादुई विद्या हा आहे. त्यामुळे वाच्यार्थाने अशक्यप्राय असणारी गोष्ट करून दाखवण्याची कामगिरी करून दाखवणे या अर्थाने किमया हा शब्द मराठीत वापरला जातो. जसे: रंकाचा राव करण्याची किमया एक सरकारच करू जाणे. तसेच किमया या शब्दाचा एक अर्थ जादू असाही आहे.

या शब्दाला फार मोठा इतिहास आहे. इजिप्शियन लोक स्वतःच्या देशाला “खेम” म्हणजे काळ्या मातीचा देश असे म्हणत असत. नाईल नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे येथील जमीन खरोखरीच काळी आणि सुपीक आहे सुद्धा. इजिप्त मध्ये पहिल्यांदा इतर धातूंचे सोन्यामध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न झाले. त्याला केमी असा शब्द रूढ झाला. या केमीला अरब लोकांनी अल् हा प्रत्यय लावून अल्-केमी हा शब्द तयार केला. याच अल्-केमी शब्दावरून किमया हा शब्द मराठीत आलेला आहे. अगदी शुद्ध मराठी वाटणाऱ्या या शब्दाची पाळेमुळे इतकी दूरवर पसरलेली आहेत!