शरद ऋतूतल्या आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते.
या कालावधीमध्ये पाऊस माघारी गेलेला असतो आणि शेतामध्ये पिके तयार झालेली असतात. वातावरण आल्हाददायक होऊ लागलेले असते. अशावेळी शेतांवर नजर ठेवून धान्य व पिकांचे रक्षण करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. याच मूळ उद्देशाने अश्विन पौर्णिमेच्या रात्री जागरण करण्याची प्रथा सुरू झाली असावी. कालांतराने या पद्धतीशी एक धार्मिक आख्यायिका पण निगडित झालेली आहे आणि त्यावरूनच कोजागिरी हा शब्द आलेला आहे.
असे मानले जाते की या पौर्णिमेच्या रात्री आकाशमंडळातून लक्ष्मी पृथ्वीतलावर येते आणि ती जागोजागी “को जागर्ति?” म्हणजेच “कोण जागे आहे? “ असे विचारीत असते. तेव्हा जी मंडळी जागी असतात त्यांच्याकडे लक्ष्मीचा अधिवास होतो अशी कल्पना आहे. या “को जागर्ति” याच शब्दावलीचा कोजागिरी असा अपभ्रंश झालेला आहे म्हणून कोजागिरी पोर्णिमा हा शब्द रूढ झाला.
पिके पूर्ण तयार झालेली असताना आणि चंद्रप्रकाश असताना जी मंडळी त्यांची राखण करण्याकरता जागी राहतात त्यांच्याकडे लक्ष्मीचा अधिवास तर होणारच!
कृषीप्रधान असणाऱ्या देशातील एका अत्यंत व्यावहारिक बाबीला धर्माचे अधिष्ठान दिल्यामुळे ती किती खुबीने जीवनाचा भाग झालेली आहे हे जरूर नोंद घेण्यासारखे…
कोजागिरीच्या रात्री दूध पिण्याचा संबंध मात्र थेट कृष्णाच्या रासलीलेशी लावला जातो. रात्री जागरण करत असताना आणि थंड हवामान असताना आटीव केशरी दूध घेणे हे प्रकृतीसाठी निश्चितच चांगले आहे या गोष्टीला दिलेले हे धार्मिक अधिष्ठानच आहे.