गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

संस्कृतीचा भाषेवर आणि भाषेचा संस्कृतीवर परिणाम सतत होत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये दूध,दही, लोणी व तूप यांना विशेष महत्त्व आहे हे आपल्याला माहीतच आहे. याच गोष्टींमधून आजचा आपला शब्द आलेला आहे.

लोणी काढण्याची पण एक प्रक्रिया आहे. सर्वप्रथम दूध तापवून त्याची साय अलग करावी लागते. या सायीला विरजण लावून त्याचे दही करावे लागते. आणि या दह्याचे मंथन करून ,त्याला घुसळून मग लोणी मिळते. म्हणून लोण्याला मथित असे म्हणतात. जे मंथनातून निघते ते मथित.

त्याचप्रमाणे एखाद्या बाबीवर विचार करत असताना प्रथम त्या बाबीशी संबंधित सुसंगत आणि महत्त्वाचे मुद्दे तेवढे बाजूला काढून त्यांचे खूप मंथन करून, त्यांच्यावर विचारांची भरपूर घुसळण करून जो निष्कर्ष निघतो तो निष्कर्ष म्हणजे मथितार्थ.

जसे: सर्व धर्मग्रंथांचा मथितार्थ हाच की आत्मानुभवाशिवाय सुख नाही.

दुर्दैवाने हा शब्द “मतितार्थ” असाच लिहिला जातो आणि वाचलाही जातो. ही बाब इतकी जास्त अंगवळणी पडलेली दिसते की अगदी गुगल व्हाॅईस टाईप सुद्धा मतितार्थ हाच शब्द दाखवते!!!

मात्र अर्थाच्या आणि व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा हा शब्द मथितार्थ असाच लिहिला आणि वाचला पाहिजे.