गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

मुहूर्तमेढ म्हणजे कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना काही विशिष्ट धार्मिक विधी करून रोवलेला एक खांब. म्हणून कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करणे याला मुहूर्तमेढ रोवणे असा शब्दप्रयोग वापरात आहे. जसे: शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

यातील मेढ हा शब्द संस्कृत मधील मेथि: या शब्दावरून आलेला आहे. मेथि: म्हणजे खांब, विशेषेकरून मळणी करण्यासाठी लावलेला खांब ज्याला बैल बांधून त्यांना धान्यावर फिरवून मळणी केल्या जात असे. या खांबाचे महत्त्व तो मळणीसाठी वापरला जात असल्यामुळे विशेष होते. म्हणूनच हा खांब रोवतांना भरपूर धान्य मिळून समृद्धी यावी यासाठी काही मंत्र किंवा काही विशिष्ट सूक्ते इत्यादींचे उच्चारण करण्याची पद्धत होती. याच परंपरेमधून कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना अशा पद्धतीचा खांब मंत्रोच्चार व पूजा विधी करून रोवण्याची पद्धत सुरू झाली. म्हणून मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे शुभ कार्याची सुरुवात करणे.

प्राचीन काळी माणसाला स्वतःच्या वापराची जमीन ही जंगले साफ करून आणि त्यातील श्वापदांना पळवून लावूनच ताब्यात घ्यावी लागत असे. अशा जमिनीवर शेती किंवा इतर कोणतेही मानवी व्यवहार चालू करण्याआधी ही भूमी आता मनुष्यांच्या वापरार्थ योग्य झालेली आहे आणि तिथे इतरांनी प्रवेश करू नये हा संदेश सुद्धा मंत्रांच्या घोषात खांब लावूनच दिला जात असे. आज देखील स्वतःच्या मालकीच्या जागेला कुंपण करताना पहिला खांब पूजा करून लावण्याची प्रथा आहेच. बरेचदा इतर टोळ्यांकडून ही जागा जिंकून घेण्यात आलेली असे. त्यामुळे अशा जागेवर स्वतःचे कुलदर्शक चिन्ह असणारा खांब (Totem Pole) स्वामित्वाची खूण म्हणून लावण्यात येत असे.