आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं | | १ | |
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका | | २ | |
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्दचि गौरव पूजा करु | | ३ | |
शब्दांचे महात्म्य सांगणारा तुकोबांचा हा प्रसिध्द अभंग. शब्द आपण रोज उच्चारतो पण त्यांच्या अर्थाकडे हवे तेवढे बारीक लक्ष देतोच असे नाही. ह्या शब्दांचा आणि त्यामागे दडलेल्या अर्थांचा शोध घेण्याचा हा माझा स्वांतसुखाय केलेला प्रयत्न….
आजचा शब्द: ओनामा
एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे या अर्थाने ओनामा केला असा शब्दप्रयोग आपण वापरतो. जसे आज मी शब्दांविषयी लिहिण्याचा ओनामा केला म्हणजेच सुरुवात केली.
कोणतीही गोष्ट करताना सिद्धांना म्हणजे परम गुरूंना अभिवादन करण्याची पद्धती पुरातन काळापासून भारतात होती. त्यामुळे “ओम नमः सिद्धम” असे म्हणून कोणत्याही कामाची सुरुवात करावी असा संकेत होता. कालांतराने या वाक्याचा अपभ्रंश होऊन “ओनामासिधम्” आणि मग फक्तच ओनामा असे रूप वापरात येऊ लागले. यातूनच कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे याला ओनामा करणे हा शब्द रूढ झाला.