या शब्दाशी निगडित एक छान गोष्ट मला आठवते. प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजसुधारक श्री. म. माटे हे प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांचे शिक्षक आणि गुरु होते. एक दिवस शांताबाई ओतप्रोत या शब्दाविषयी माट्यांशी बोलत होत्या. माटे म्हणाले, “शांते, तू कोष्टी ना! मग तुला या शब्दाचा अर्थ कसा माहीत नाही? “ माट्यांचे म्हणणे एका अर्थाने योग्यच होते. हा शब्द कापड विणण्याच्या प्रक्रियेशी अतिशय जास्त निगडित आहे.
ओतु म्हणजे कापडातील उभा धागा आणि प्रोतु म्हणजे आडवा धागा. इंग्रजीत याच धाग्यांना वार्प आणि वेफ्ट असे शब्द आहेत. ओतु आणि प्रोतु म्हणजे उभे आणि आडवे धागे यांनी कापड तयार झालेले असते. किंबहुना या उभ्या आणि आडव्या धाग्यांव्यतिरिक्त कापडाचे वेगळे असे काही अस्तित्वच नसते. त्यामुळे ओतप्रोत या शब्दाचा अर्थ एकात एक पूर्णपणे गुंफलेला किंवा अत्यंत अविभक्त असा होतो. पूर्ण गच्च भरलेला या अर्थाने सुद्धा हा शब्द वापरला जातो.
जसे: ज्ञानेश्वरांचे साहित्य शांत रसाने ओतप्रोत आहे.
म्हणजे शांत रस ज्ञानेश्वरांच्या काव्याचा इतका अविभाज्य भाग आहे की शांत रस काव्यातून वेगळा काढणे शक्य नाही असा त्याचा अर्थ समजायचा.