गट

  • ब्लॉग पोस्ट

टॅग

सुतराम हा शब्द दोन पद्धतीने वापरण्यात येतो. जसे: १. भारत पाकिस्तानचे संबंध सुधारण्याची सुतराम शक्यता नाही. आणि २. आमचा आणि त्यांचा सुतराम संबंध नाही. म्हणजे एका ठिकाणी तो शक्यता नाकारतो तर दुसऱ्या ठिकाणी संबंध नाकारतो.

माझ्या मते सुतराम या शब्दातील मूळ संस्कृत शब्द “सूत्रम्” असा आहे. सूत्र म्हणजे समान धागा.मराठीतला सूत हा शब्द सुद्धा या संस्कृत शब्दावरूनच आलेला आहे. कोणत्याही गोष्टीत जेव्हा काही समान धागा असतो तेव्हा ती गोष्ट सुसूत्र आहे असे सुद्धा आपण म्हणतो.

“सूत्रम्” व्याकरणिक दृष्ट्या द्वितीया विभक्ती आहे त्यामुळे कर्म हा अर्थ त्यातून ध्वनीत होतो. कोणतीही गोष्ट होण्याची शक्यता विचारात घेत असताना त्या बाबीच्या आधीच्या पुढच्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठे काहीतरी कर्ता - कर्म किंवा तत्सम संबंध असावा लागतो. जर असे काही सूत्रच नसेल तर ती गोष्ट होण्याची सुतराम शक्यता राहत नाही. “सूत्रम् नास्ति” असा सूत्राचा निषेध त्यामध्ये दडलेला आहे.

त्याचप्रमाणे जर दोन गोष्टींमध्ये कोणतेही सामान्य सूत्र किंवा समानता जर नसेल तर त्यांचा संबंध असणे ही गोष्ट अतिशय दुरापास्त आहे त्यामुळे ज्यांत सूत्राचा अन्वय नाही अशा गोष्टींचा एकमेकांशी सुतराम संबंध नाही असे म्हणता येते.

कुण्या व्यक्तीचे कुणा दुसऱ्याशी जर चांगले संबंध तयार झाले तर त्यांचे सूत जुळले हा शब्दप्रयोग आपण मराठीत वापरतो ही बाब उल्लेखनीय.