नुकत्याच उद्भवलेल्या पाठीच्या दुखण्याचा आस्वाद घेत मी पलंगावर झोपलोय. वेदनांना पण त्यांची एक लय असते हे आता छानपैकी समजतंय, खिडकीतून आकाशात झालेली ढगांची दाटी दिसतेय. खरं तर खूप दिवसांत पाऊस पडलेला नाही. वातावरण कुंद होतं, ढग दाटून येतात, जोराचा पाऊस येईलसा वाटतो पण तसं होत काहीच नाही. फक्त ऊकाडा आणि तगमग वाढवून ढग निघून जातात.
जी स्थिती बाहेरची तीच मनाची. ऊदासी, थोडा कंटाळा, वेदना यांचं एक विलक्षण मिश्रण तयार झालंय. कुठेतरी सुखाचा मेघ बरसावा अशी ओढ मनात पण जागलीय.
पण आजचा रंग जरा वेगळा दिसतोय. वाराही सोसाट्याचा सुटलाय. आज निदान तापलेली धरती तरी शांत होईलच असं वाटतंय. मनाचं काय करावं ते तर लक्षात येत नाही. पण संगीताच्या सुरांनी वेदनांचा विसर पडतो हे अनुभवलंय. सहजच भीमसेनजींचा मेघ मल्हार आठवतो आणि नकळतच हात मोबाईलकडे जातो. भीमसेनजींच्या घनगर्ज आवाजातले “बादरवा बरसन लागे”’ चे सूर काही वेगळीच जादू घेऊन येतात. ढगांची गर्जना, विजांचे तांडव भीमसेनजींच्या सुरांसोबतच आकाशात पण सुरू होते आणि पावसधारा बरसू लागतात. तापलेला आसमंत शांत होतो, थंड वाऱ्याची झुळूक पण येऊ लागते.
मनाची तगमग आणि वेदनाही थोड्या मागे पडतात, काही कमी होतात पण बाहेर झालाय तसा थंडावा, शीतलता मनाच्या अंतरंगात काही येत नाही. आपसूकच कुमारजींच्या सुरांची आणि कबीराच्या शब्दांची आस लागते. मग कबीराचे शब्द आणि कुमारांचे सूर असा समसमा संयोग असणारे एक संगीतशिल्प सामोरे येते… कबीर सांगतोय, “अवधूता, युगन युगन हम योगी, ना आवें, ना जावें, मिटैना कबहूँ, सबद अनाहद भोगी।” पहिल्याच चरणात कबीराचे शब्द मनाचा ठाव घेतात. अर्थांची अनेक रूपे प्रकट करतोय हा माणूस!
अवधूत म्हणजे निःसंग. ज्याचे रागलोभाचे, मायेचे बंध तुटलेत तोच खरा निःसंग म्हणजे अवधूत!
प्रत्येकातच दडलेल्या अवधूतालाच साक्षी ठेवून कबीर स्वत:तल्या अवधूताला आवाहन करतोय. तो सांगतोय “मी युगानुयुगे हाच आत्मयोग, हीच अनुभूती घेत आलोय. मी ना कधी या संसारात आलोय आणि त्यात अडकणारा तर मी नाहीच. म्हणूनच मीच तो अवधूत आणि माझ्याच साक्षीने मी बोलतोय, नव्हे परमात्माच माझ्यातून बोलतोय.”
अनहद म्हणजे सृष्टीच्या सृजनाच्या प्रसंगीची असीम, आदिम शांतता. सर्व ध्वनी, संगीत निर्माण होतांना हे अनहद भंगणारच असते म्हणूनच की काय, पण प्रत्येक ध्वनीच्या, सुरांच्या गाभ्यात कुठेतरी एक सूक्ष्म वेदना दडलेली असते. पण कबीराची रीतच न्यारी! तो तर हया अनहदाच्या शांततेचा, आदिमतेचाच सूर ऐकतोय आणि फक्त निखळ आनंदच उपभोगतोय. अर्थाच्या छटांची किती वर्णने सांगावीत असे हे शब्द!
कुमारजीसोबत वसुंधराजींचाही स्वरही आहे ह्या भजनात. कुमारांची गायनाची पट्टी ही सर्वसामान्य पुरुष गायकांपेक्षा वरची. त्यामुळे वसुंधराजींच्या सुरांशी त्यांचा सूर सहजच एकतान होऊन जातो. वाहणाऱ्या झऱ्यासारखा वसुंधराजींचा सूर झुळझुळत राहतो. आणि त्या पार्श्वभूमीवर कुमारजींच्या सुरांची आवर्तने लाटांसारखी आपल्याला चिंब करीत जातात.
कबीर सांगतोय, “सभी ठौर जमात हमरी, सबही ठौर मेला, हम सब मय, सब है हम मा. हम है बहुरि अकेला।” तो म्हणतोय, “मी आणि माझ्यासारखे लोक सर्वत्र आहेत. आम्ही तर सर्वांमधेच आहोत. स्थळकाळाच्या आम्हांला मर्यादाच नाहीत. मी सर्वांना अनुभवतो म्हणून सर्वच माझ्यात आहेत आणि सर्व माझ्याकडून जाणले जातात म्हणून सर्वांमध्ये मीच आहे. सर्वच माझ्यात आहेत, मी सर्वांमध्ये आहे पण, तरीही मी एकाकीच आहे, निर्गुण निराकारच आहे!” अर्थाच्या किती घटा विखरते हया माणसाची वाणी ! रूढार्थाने अशिक्षित असणाऱ्या ह्या माणसाच्या वाणीत हा चिदविलास कोठून आला असेल?
मग जाणवतं की हे शब्द, ही मस्ती त्याला झालेल्या आत्मप्रचितीतूनच येतेय! म्हणूनच या शब्दांमागे अनुभावाचं वजन आहे. आपसूकच कवि धनंजयांच्या विषापहार स्त्रोत्रातल्या “स्वात्मस्थितः सर्वगतः” या श्लोकाची आठवण येते आणि जाणवतं की हा अवलिया काहीतरी अलौकिकाचा स्पर्श असलेलं सांगतोय.
हाच अलौकिकाचा स्पर्श कुमारांच्या गायनाला सुद्धा लाभलेला आहे. संगीताचं व्याकरण समजलं तर उत्तमच पण नाही समजलं तरी कबीराचा भाव, त्याची विरक्ती, त्याच्या एकाकीपणाची मस्ती हे तर कुमारजी आपल्या पर्यंत पोहचवतातच. प्रत्येक छोट्या छोट्या तानेतून, स्वर लगावातून कबीराचा आशय आपण अनुभवत असतो.
कबीराच्या वाणीला तर आता बहर आलाय.त्याची ऊन्मनी अवस्था त्याच्या वाणीतून ओसंडून वाहतेय. तो सांगतो, “हम ही सिद्ध, समाधि हम ही, हम मौनी, हम बोले। रूप, स्वरूप अरुप दिखावे, हम ही में हम तो खेले। “
मीच तो परमात्मा, परम ज्ञायक! आणि माझाच अनुभव मला येतोय, त्यातच मी आकंठ बुडालोय म्हणून समाधी पण मीच आहे. साध्य साधनांचे भेद आता राहिलेच नाहीत! मी मौन आहे पण अनुभूती माझ्या अंगांगातून अशी काही स्फुरतेय की त्यातूनच मी बोलतोय. माझं रूपही स्वरुपाशी तदाकार झालंय. ते स्वरूप तर अरुपी म्हणजे अतिंद्रिय, निर्गुण असेच आहे. म्हणून आता कोठलाच भेद नाही, शंका नाही, मी माझ्या आत्मतत्वात मनसोक्त खेळतोय. ज्ञानेश्वरांच्या “दीपकी दीपक मिळाले. वाती शून्य झाल्या” अशा अवस्थेशीच नाते सांगणारा आहे हा कबीराचा अनुभव.
हा पराकोटीचा अनुभव सांगण्यासाठी त्याच ताकदीचे सूर पण लागतातच. कुमारजीही त्यांच्या गानसमाधीत इतके एकतान झालेले आहेत की कबीर आणि ते तादात्म्य साधतात आहेत असा अनुभव येतो. अर्थवाही, अतिशय अचूक शब्दोच्चार शाणि शब्दांची फेक फक्त स्तिमीत करणारीच. विशेषतः “हमहीमें हम तो खेलें “म्हणतांना तर त्यांचा भावाविष्कार काय उंची गाठतो! फक्त अवर्णनीयच!
कबीराची वाणी आता चिरंतनाची वाट चालतेय, त्याची लागलेली आत्मानंदी टाळी शब्दांशब्दातून प्रगट होतेय. तो गातोय “कहे कबीरा, जो सुनो भाई साधो, ना कोई इच्छा। अपनी मढीमें आप में डोलू, खेलू सहज स्व-इच्छ।”
जीवनामध्ये जे काही श्रेयस, प्रेयस आहे ते तर आत्मज्ञानातून मिळालंच आहे. आता कसली इच्छा होणार? अपूर्णता असेल तर इच्छेला जागा आहे. मी तर संपूर्ण आनंद रूप आहे- मग इच्छा नसावी हेच योग्य. मी माझ्याच स्वरूपाच्या झोपडीत, आश्रयाला आहे, असा काही आत्मरंगात रंगलोय की माझ्यातच मी विहार करतोय, सर्व सुखांचा विलास माझ्यातच आहे! कुठेतरी सतत जाणवतंय ते हे की, कबीर, त्याचे शब्द हे तर फक्त माध्यम आहेत! साक्षात परमात्मा आपल्याशी संवाद साधतोय कबीराच्या माध्यमातून. त्यामुळेच कबीर जे सांगतोय ते विलक्षण प्रत्ययकारी आहे!
आणि कबीराची ही वीरानीयत, हा आनंदविलास कुमारजी त्यांच्या सुरात मांडत आहेत. खरं तर तेही गाताहेत फक्त त्यांच्यासाठीच पण आपण सुदैवाने त्या आविष्काराचा एक भाग बनतो आहोत! “अपनी मढी में आपमें डोलू” हे म्हणतांना कबीराची, उन्मनी अवस्था के आपल्या समोर ऊभी करण्याचं सामर्थ्य त्यांच्या गायनात कोठून येतं हे फक्त ऐकत राहावं आणि चक्क नतमस्तक व्हावं!
कबीर खरा कसा होता, होता की नव्हता असे अनेक वाद आहेत. पण जर असा काही अवलिया, माणूस कधी होऊन गेला असेल आणि निर्गुणाची जाण त्याला असेल तर तो सुरांत व्यक्त होतांना कुमारांचाच सूर घेऊन होईल!
हळूहळू मी पण भानावर येतो. मनाच्या, शरीराच्या वेदना सध्या तरी शमल्या आहेत. ही स्थिती अशी टिकणारी नाही, नसतेच. पण सध्या तरी “आनंदाचा घनु” मला चिंब लिंब करून गेलाय एवढंच खरं! ज्या संचिताने वेदना मिळाल्या त्याच संचितातून कुठे तरी हा आनंद पण मिळावा ही पण त्या दयाघनाचीच कृपा!
काही वेळ निघून जातो. वेदनांची लय द्रुताकडे बिलंबीताकडून जातेय. त्या असह्य होतात की काय असे वाटायला लागते. आणि तेव्हाच पार नेणिवेत गेलेला कबीर सांगू लागतो,”ऐक ना, सुन भाई साधो! तू तर साक्षात आनंदरूप आहेस. ह्या वेदना तुझं रूपच नाहीत.” मनात उभारी येते. मी पुन्हा सावरतो, कबीरही त्याच्या समाधीतून माझ्यापर्यंत पोहोचतो, “चलते रहो!” हे सांगत!